Nisargyog Pratisthan

आरोग्यसेवा

panchakarm | पंचकर्म व्याधीमुक्त होण्याचा सहजमार्ग

Panchakarm | पंचकर्म व्याधीमुक्त होण्याचा सहजमार्ग | What is panchakarm

आयुर्वेद म्हणजे नाडीपरीक्षा आणि औषधी पुड्या, अशीच प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. आयुर्वेदाने उशीरा गुण येतो. जुनाट आजारांवर उपयुक्त असेही गैरसमज सामान्य माणसात आहेत, पण ते प्रत्यक्षात तसे नाही. आयुर्वेदात निदान व चिकित्सेच्या पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या पहावयास मिळतात.आयुर्वेदाने चिकित्सेचे दोन प्रमुख विभाग वर्णन केले आहेत.

१) शोधन चिकित्सा २) शमन चिकित्सा

  • Panchakarm Shodhan Chikitsa |शोधन चिकित्सा | :-

  • शरीरातील वाढलेले व नको असलेल दोष शरीराबाहेर काढून टाकणे व शरीर शुद्ध करणे.
  •  
  • शमन चिकित्सा |Shaman Chikitsa :-
  •  
  • चिकित्सेच्या सहाय्याने बिघडलेल्या दोषांचे शरीरात शमन करणे.
    Panchkarma-Procedures
    Panchkarma-Procedures
  •  

सध्या व्यवहारात शमन चिकित्सेचे अनेक प्रकार प्रचलित असून प्रायः याचाच वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो वा आढळतो.आयुर्वेद चिकित्सा पद्धतींचा उपयोग ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या कारणासाठी म्हणजेच स्वस्थ (निरोगी) माणसाचे आरोग्य टिकविणे व आतुर (आजारी) माणसाचे आजार घालविण्यासाठी होतो. आयुर्वेदाने आजार बरा करण्याबरोबरच तो होऊच नये, यासाठी मार्गदर्शन केले आहे, हेच आयुर्वेदाचे वैशिष्ट्य जाणवते.यापैकी शोधन चिकित्सेचे वर्णन प्रथम केले आहे. कारण व्याधीमुक्तीसाठी या चिकित्सा पद्धतीचा फार महत्त्वाच्या वाटा असून, शोधनाद्वारे दोष निघून दोषांचे ‘शेष दोष शमयेत् ।’ शमन करावे असे वर्णन आढळून येते. शरीराची शुद्धी ज्या पाच कर्मांद्वारे केली जाते, त्यांना ‘पंचकर्म’ किंवा ‘पंचशुद्धीक्रिया’ असे संबोधले जाते. त्या क्रिया अशा –

१) वमन, २) विरेचन, ३) बस्ती, ४) नस्य, ५)रक्तमोक्षण

  • Panchakarm Vaman Chikitsa | वमन कर्म :- 

  • आमाशय स्थित (पोटाच्या आश्रयाने त्याच्या बिघाडाने होणाऱ्या व्याधी) दोष किंवा कफदोषाचे जेवढे विकार वर्णन केले आहेत, त्यांच्या चिकित्सेसाठी या कर्माचा उपयोग केला जातो. ‘वमन कर्म’ म्हणजे शरीरात साचलेले कफप्रधान दोष शास्त्रशुद्ध पद्धतीने औषधी तूप, तेल इ. देऊन शरीर स्निग्ध करून उलटीच्या सहाय्याने शरीरातून बाहेर काढणे, याला ‘वमन कर्म’ म्हणतात.स्वस्थ माणसासाठी (निरोगी) वसंत ऋतूमध्ये (फेब्रुवारी, मार्च) शास्त्रशुद्ध वमनाचा आदेश आहे, जेणेकरून त्याला वर्षभर कफविकार होत नाहीत. आजारी माणसासाठी (आतूर, रोगी) आजाराच्या स्वरुपानुसार विशिष्ट औषधी सिद्ध तूप किंवा तेल म्हणजे स्नेहपान देऊन (५ ते ७ दिवस) नंतर ज्येष्ठ मधाचा काढा, उसाचा रस किंवा दूध यापैकी कोणतेही एक द्रव पदार्थ आकंठ पाजून उलटी करविली जाते.पित्त पडेपर्यंत (आपित्तदर्शनात) झालेली उलटी (वमन) उत्तम मानली जाते. यात स्नेहपानामुळे शरीरातील दोष कोठ्यात (आमाशयात) आणून मग उलटीच्या द्रव्यांसोबत मुखावाटे शरीराबाहेर टाकले जातात. म्हणजे समूळ रोग नष्ट होण्यास मदत होते. वमनानंतर क्रमाक्रमाने आहार वाढवला जातो. याला ‘संसर्जन क्रम’ म्हणतात.

    * विरेचन कर्म :-

  • विरेचन म्हणजे रेचन किंवा जुलाब. पूर्वी दर आठ किंवा पंधरा दिवसांनी रेचन होण्याची पद्धत होती. पंचकर्मापैकी या कर्माचा सर्रास वापर आजही अनेक वैद्य करतात. पित्तदोषज विकारांवर विरेचन श्रेष्ठ आहे. नुसतेच जुलाबाचे औषध घेतल्यास आतड्यांना ताण पडतो. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजेच औषधी सिद्ध तूप (३/५/७) दिवस देऊन पित्त शाखांमधून कोठ्यात आणून मग जुलाबाचे औषध दिल्यास विरेचन विनासायास होते.स्वस्थ माणसाने शरद ऋतुमध्ये (सप्टें. आक्टों) विरेचन कर्म केल्यास वर्षभर पित्ताचा त्रास कमी होतो. या ऋतूत (शरद) नैसर्गिकरित्या पाऊस संपून ऊन पडल्याने एकदम उष्णता व पित्त वाढलेले असते. म्हणून त्याला विरेचनाद्वारे काढून टाकल्यास पित्ताचे आजार होत नाहीत.

    * बस्ती कर्म :- आमाशयासाठी ‘वमन’ पच्चमानाशयासाठी विरेचन ही दोन महत्त्वाची कर्मे झाल्यानंतर पक्वाशय (मोठे आतडे) यावर कार्य करणारे बस्ती कर्म असून आयुर्वेदाने त्याला ‘अर्धीचिकित्सा’ असे संबोधून त्याचे महत्व वर्णन केले आहे.’बस्ती कर्म’ म्हणजे व्यवहारी भाषेत ‘एनिमा’ देणे.पण एनिमा म्हणतात त्याचा उपयोग केवळ संडास साफ करण्यासाठीच होतो, असा एक गैरसमज आढळून येतो.आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेची व्याप्ती फार मोठी केली असून वातदोषाची निर्मिती मोठ्या आतड्यात (पक्वाशयात) होते, असे आयुर्वेद मानतो आणि त्याचे शमन या बस्ती कर्मद्वारे मोठ्या आतड्यात केले जाते.वात दोषाचं महत्त्व वर्णन करताना पित्त व कफ हे दोष पांगळे (पंगु) असून त्यांना शरीरात सर्वत्र नेण्याचे काम वात दोष करतो, असे सांगितले आहे. जर वातावर नियंत्रण ठेवले तरच तिन्ही दोष नियंत्रित राहू शकतात व व्याधी टळू शकते. म्हणून बस्ती कर्माला ‘अर्धीचिकित्सा’ असे वर्णिले आहे. स्वस्थ माणसाने वर्षाऋतूत पावसाळ्यात बस्ती कर्म केल्यास वर्षभर वाताचा त्रास होत नाही. बस्तीचे दोन मुख्य प्रकार असे

    १) निरूह बस्ती (आस्थापन बस्ती) २) अनुवासन बस्ती (स्नेह बस्ती)

    * निरूह बस्ती :-

  • या प्रकारात व्याधीप्रमाणे औषधी वनस्पतीचा काढा तिळीचे तेल + सैंधव + औषधी कल्क+मध एकत्रित करून घुसळून एनिमा पॉटद्वारे देतात.अनुवासन बस्ती औषधी वनस्पतीद्वारे सिद्ध केलेले तेल गुद्‌द्धारावाटे कॅथेटरने आत सोडले जाते. बस्तीचे ७ किंवा १४ वा २१ दिवस पर्यंत कर्म करून घेण्यास सांगितले आहे. अवस्थेनुसार वैद्याने ते ठरवावे.बस्तीच्या या दोन प्रकारांव्यतिरिक्त बृहणबस्ती, मात्राबस्ती, पिच्छाबस्ती, उत्तणबस्ती इ. अनेक प्रकार वर्णन केलेले आहे.

    * रक्तमोक्षण कर्म

    रक्तमोक्षण शब्दाचा अर्थच ● मुळी ‘अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढून टाकणे’ असा आहे.आयुर्वेदाने ‘वात, पित्त, कफ’ हे तीन दोष ‘रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सप्तधातू आणि मल, मूल, मूत्र व स्वेद हे तीन मल यांचे वर्णन केले आहे. यापैकी त्रिदोषांचे कर्म हे अन्नवह स्रोतात होत असते. (मुखापासून गुदापर्यंत) पण धातूंमधील दोष रसरक्त संवहनामार्गे कोठ्यात आणि कोठ्यातून पुनः धातूपर्यंत नेण्याचे काम प्रामुख्याने रक्त हा धातू करतो. म्हणून त्रिदोषानंतर रक्ताला आयुर्वेदाने महत्त्व दिले आहे.’रक्त पुष्टी’ हा विचार प्राचीनकाळी आयुर्वेदात वर्णन केलेला आजही आपल्याला व्यवहारात प्रत्यक्ष पहावयास मिळतो. धातूंमधील दोष कोठ्यात आणून बाहेर काढण्यापेक्षा किंवा सहजासहजी न निघणारे दोष जवळच्या मार्गाने रक्तवाहिन्याद्वारे बाहेर काढून टाकले जातात. त्वचा विकारांपासून ते अगदी हृदयविकारापर्यंत अनेक व्याधींवर रक्तम ोक्षण हे कर्म उपयोगात आणतात.रक्तमोक्षण हे सुईद्वारे, शृंग (शिंग) पोकळ आलाबू इ. यंत्राद्वारे आणि जलौका (जळवा) द्वारे करतात. आल्यपिक चिकित्सा किंवा आशुकारी (त्वरित) गुण देणारी चिकित्सा म्हणूनही याचे वर्णन केले जाते.

    * नस्य कर्म | Nasya karm :- 

    नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे.डोके, पंच ज्ञानेंद्रिये म्हणेजच नाक, कान, डोळे, जीभ, मान इ. अवयवांच्या विकारावर नस्य कर्माचा उपयोग होतो. नस्यामुळे केस गळाणे थांबते, डोके दुखी, अर्धशिशी, डोळे दुखणे, कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ, जुनाट सर्दी, श्वास ३. अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत होते. निरोगी (स्वस्थ) माणसाने रोज नाकात २-२ थेंब तेल, तूप सोडल्यास बाहेरील धूर, धूळ, परागकण इ. गोष्टींपासून त्याचे रक्षण होते. अशा पाच कर्माच्या सहाय्याने आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य ‘स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकवणे व रोगी माणसाला आरोग्य प्रदान करणे’ हे पाळता येईल. म्हणून आपणांकडून अपेक्षा आहे की आयुर्वेदाची चिकित्सा करणाऱ्या वैद्यांकडून आपण पंचकर्म करून घेण्याचा आग्रह धरावा म्हणजे हा लेखन प्रपंच सार्थकी लागला असे समजू !

panchakarm | पंचकर्म व्याधीमुक्त होण्याचा सहजमार्ग
Scroll to top